परमेश्वर शक्तीचे मूर्त रूप अग्नी, वरुण, वारा, पृथ्वी, समुद्र, नद्या या रुपातून दिसते, सत्त्व, रज, तम, हे त्रिगुण विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहेत. चराचर सृष्टीकर्ता विविध रुपे घेऊन उत्पत्ती, स्थिती व लय असा सृष्टीचा भार चालवतो. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव जिथे एकरूप झाले तिथे दत्तावतार सिध्द झाला. दत्तप्रभू हे आद्य गुरु समजले जातात. विश्वाचे नियमन करणारी जी शक्ती आहे ती अखिल विश्व व्यापून उरते ती आद्यशक्ती दत्तरुपाने दिसते. श्री दत्तमूर्ती ही अतिशय सात्विक, शांत, लोभस, आनंदमयी असते. दत्तरुपात ईश्वर आणि गुरु अशी दोन रुपे असून त्यांना अवधूत चिंतनी श्री गुरुदेव दत्त म्हटले जाते. अवधूत म्हणजे मूर्तिमंत ज्ञानवैराग्य दत्तसंप्रदाय हा त्यागप्रधान असून श्री दत्तगुरु आत्मज्ञान करून देतात. दत्तअवतारातील मूळ पुरुष श्रीपाद-श्रीवल्लभ त्यानंतर नृसिंह सरस्वती आणि पुढे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटचे स्वामी समर्थ मानले जातात. भिक्षेवर जगणे, अपरिग्रह व संन्यस्त वृत्ती ह्या त्रयींवर आधारलेला दत्तसंप्रदाय…

ह्या दत्तसंप्रदायाचे अनुयायी आणि अनेक सत्वपरीक्षांमधून स्वामी समर्थांच्या कसोटीस उतरलेले श्री. नाना वालावलकर! “जो नम्र झाला भूता, त्याने कोंडिले अनंता” अशा साक्षी भावाने पू. श्री. नानांच्या रुपाने ख-या सत्पुरुषाची संत, महात्म्याची ओळख झाली. वाचकांसाठी ह्या योगियांच्या योग्याचा परिचय करून देणारा खास प्रसाद…

अवतारी पुरुष हे उत्तम कुळात जन्माला येतात. १९३६ सालात एकादशीच्या दिवशी वालावलकर कुटुंबात कोकणात मोरगाव या गावी एक अलौकिक बालक जन्माला आले. सावंतवाडी तालुक्यातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरगाव हे निसर्ग संपन्न गाव. पू. कृष्णाजी वालावलकर हे अत्यंत धार्मिक वृत्तीचे, सदाचरणी म्हणून गावात प्रसिध्द होते. आजोबांच्या या लौकिकाचा वारसा नानांनी आज चालवला आहे.

नानांचे बालपण एका शेतकरी कुटुंबात सामान्य स्थितीत व्यतीत झाले. सातव्या-आठव्या वर्षापासून माळावर गुरे राखण्याचे काम त्यांना करावे लागे. एकदा असेच गुरे राखण्यात दंग असलेल्या नानांना संध्याकाळ झाली, दिवस मावळला याची शुध्द राहिली नाही. त्यावेळी एक म्हातारा माणूस हातात दंड, कमंडलू, पायात खडावा, उंच धिप्पाड उग्र चेह-याच्या माणसाने नानांना घरी जायला उशीर होतोय असे सांगून दरडावले आणि ‘‘श्री स्वामी समर्थ’’ असे नामस्मरण करण्यास सांगितले व तो निघून गेला. घरी आल्यावर त्यांनी आपल्या आईला ही गोष्ट सांगितली. त्यानंतरही एकदोन वेळा तोच म्हातारा नानांना रानात भेटला होता, परंतु त्या दिवसापासून, ‘श्री स्वामी समर्थ’ म्हणजे कोण याचा बोध त्यांना झाला नाही म्हणून ते “सद्गुरु… सद्गुरु…” असे नामस्मरण करू लागले. अक्कलकोट श्री स्वामी समर्थांची कृपा नानांवर बालपणीच झाली, परंतु बालबुध्दीमुळेच त्यांना त्याचे आकलन झाले नाही.

इयत्ता सातवी पर्यंतचे, शिक्षण घेतल्यावर नशीब अजमावण्यासाठी नानांनी मुंबईची वाट धरली. त्यावेळची मुंबई ही वेगळीच होती. तिच्याबद्दल खेडेगावच्या लोकांना कमालीचे आकर्षण होते. वयाच्या तेराव्या वर्षी नाना आपल्या बंधुंकडे ठाण्याला आले. दीड रुपया रोजावर नोकरीस प्रारंभ केला. त्यानंतर नोकरीसाठी पाच वर्षे संपूर्ण मुंबई पालथी घातली. नातेवाईकांना त्रास नको म्हणून ते बाहेर रहात. तुटपुंजे शिक्षण, खेडेगावाकडून आल्यामुळे भोळसटपणा अंगी असलेल्या नानांना मुंबईत खूप टक्के टोणपे खावे लागले. कधी अन्न मिळाले तर मिळाले, नाही तर कधी उपाशीपोटी दिवस काढावे लागले. फूटपाथवर पथारी पसरायची आणि दिवसभर नोकरीसाठी वणवण करायची! एकदा असेच फिरत असताना एका व्यक्तीशी नानांचे भांडण झाले. त्यांना पोलीस कस्टडीत ठेवले गेले. दंड भरायला पंधरा रुपये जवळ नव्हते त्यामुळे रात्रभर जेलमध्ये राहून सकाळी नानांची तिथून सुटका झाली. तेथे असलेल्या इन्स्पेक्टरनी नानांना थोडे दिवस आश्रय दिला… तीन महिने, सहा महिने अशा दोन-चार नोक-या झाल्या. गिरगावात झावबाच्यावाडीत नानांनी नऊ महिने चहा-भजी खाऊन बेकारीत दिवस काढले. जे. के. फाईल्स कंपनीत तीन-चार महिने नोकरी केली. परंतु कुठेही कायम नोकरी मिळण्याचे चिन्ह दिसेना.

या परिस्थितीला कंटाळून पुन्हा गावी जाण्याचा विचार करत एका सायंकाळी नाना ठाण्याला तलावपाळीवर असेच हताश होऊन बसले होते. खिशात फक्त सव्वा तीन रुपये होते. डोळ्यापुढे अंधार होता. भविष्याची चिंता होती… एवढ्यात एक उंच गोरेपान वृध्द गृहस्थ भिका-याच्या देशात नानांसमोर आले. त्यांनी नानांपुढे हात पसरला. खिशात फक्त सव्वातीन रुपये! त्यातील सव्वा रुपया काढून नानांनी त्यांच्या हातात ठेवला व उरलेले दोन रुपये आतल्या खिशात ठेवले. दहा पावले पुढे जाऊन पुन्हा तो भिकारी नानांजवळ आला आणि ते आत ठेवलेले दोन रुपये दे. असे म्हणू लागला. नानांना आश्चर्य वाटले. शिल्लक असलेले दोन रुपयेही त्यांनी त्यांच्या हातावर ठेवले. पुढे काय होईल ते पाहू, असा विचार करून त्या अंतज्र्ञानी सत्पुुरुषाला त्यांनी ते देऊन टाकले. थोडे पुढे जाऊन तो म्हातारा परत आला. आता त्याची मुद्रा प्रसन्न दिसत होती. तो नानांना म्हणाला, ‘अरे, मी तुझी परीक्षा पहात होतो. मला तुझे पैसे नको असे म्हणून फक्त पंचवीस पैसे स्वत:कडे ठेवून नानांना तीन रुपये त्यांनी परत केले आणि ‘घाबरू नकोस, तुझे काम होईल’ असे सांगून ते निघून गेले. ते स्वामीच होते याची खात्री नानांना नंतर पटली. आशीर्वाद फळाला आला. दुस-याच दिवशी जे. के. फाईल्समध्ये त्यांना कामावर बोलवून घेतले आणि सुमारे एकोणचाळीस वर्ष नानांनी तिथे नोकरी केली आणि याच कंपनीतून ते सेवानिवृत्त झाले…

नानांची प्रकृती मुळातच नाजूक. त्यात मुंबईत बालवयात झालेले पोटाचे हाल यामुळे ते अधूनमधून आजारी पडत. १९६४ साली नानांचा विवाह झाला. त्यांना एका प्रेमळ सत्वशील आणि सदाचरणी स्त्रीची साथ मिळाली. संसार सुरू झाला… तीन गोजिरवाणी मुले झाली. स्वामींच्या कृपेने नोकरीत स्थिरस्थावर झाले. परंतु आजारपण नानांना सोडत नव्हते. लग्न झाल्यापासून नाना डोंबिवली पश्चिमेला कोपर गावात रहात. मुखाने ‘सद्गुरु’ नामाचे स्मरण सदैव चालू असे. धर्मपरायण सहधर्मचारिणीची साथ मिळाली. परंतु आजारपण संपत नव्हते. डॉक्टरांना आजाराचे निदान होत नव्हते. सर्व प्रकारचे उपचार सुरू होते. रात्री-अपरात्री-दिवसा नाना स्वत:शीच काही तरी बोलत असत. आजुबाजुच्या लोकांच्याही हे बोलणे कानावर पडायचे. सौ.नानी अगदी त्रासून गेल्या होत्या. जो जमेल तो उपाय करीत होत्या. कोणी सांगेल तो नेम-देवधर्म करीत होत्या. आपल्या नव-याला भूत-पिशाच्च बाधा तर झाली नाही ना ? अशी शंका त्यांच्या मनात यायची, लहान तीन मुलं, त्यांच्या शाळा आणि नव-याचे आजारपण यामुळे त्या माऊलीचा जीव था-यावर नसे. अशा स्थितीत दिंडोरीच्या ब्रह्मिभूत प.पू. मोरेदादांची गाठ पडली आणि सौ.नानींच्या जीवनात सुखाची बरसात होऊ लागली. मैत्रिणीच्या सांगण्यावरून प. पू.मोरेदादांचे त्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी संतोषीमातेच्या मंदिरात प.पू.मोरेदादा येत असत. त्यांच्यावर पूर्ण श्रध्दा ठेवून त्यांना सौ.नानी शरण गेल्या आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि मोरेदादांनी वहिनींना ‘घाबरू नकोस मी सांगतो तसे कर’ असे सागूंन धीर दिला आणि प.पू.मोरेदादांनी नवनाथ ग्रंथाची तीन पारायणे करण्यास सांगितले.

सौ.नानी वेगवेगळ्या ठिकाणी जात, नेम धर्म करीत, पोथ्या वाचत ते नानांना मुळीच आवडत नसे.ते आपल्याच नादात असत. शिवाय त्यांचे शिक्षण बेताचेच. धार्मिक ग्रंथाचे वाचन-पुजा पाठ कशाचीच सवय नाही. त्यामुळे नानांचा रोष पत्करून हे सौ.नानीना हे सारे करावे लागे. यापूर्वीही दोन-तीन सत्पुरुषांना भेटून सौ.नानींनी त्यांनी दिलेले नेम केले होते. मग प.पू. मोरेदादांनी दिलेला नवनाथ पारायणाचा उपक्रम सुरू केला आणि नानांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. वाचन मोठयाने कर त्यांच्या कानावर पडतील अशा रितीने वाच असे प.पू. मोरेदादांनी सांगितले होते. पहिल्या दिवशी नाना त्यांच्यावर चिडले. परंतु हळूहळू काही न बोलता ऐकू लागले. दुसरे पारायण झाले. तिसरे पारायण झाले आणि नानांबरोबर नवनाथ बोलू लागले. कधी मच्छिंद्रनाथ, कधी कानिफनाथ, कधी चौरंगीनाथ यांची त्यांना दर्शने होऊ लागली. एक महिन्यांनी पुन्हा प.पू.मोरेदादांचे डोंबिवलीत आगमन झाले. सौ.नानींनी सारी हकीगत त्यांचा कानावर घातली. प.पू.मोरेदादांनी पुन्हा पारायण करायला सांगितले. महामृत्युंजयाचा जप त्रिकाल करायला सांगितला आणि या नवनाथांपैकी कोणी तरी एकच प्रकट झाला पाहिजे, सर्वजण काय करायचे असे सांगून पुन्हा कार्यक्रम दिला. सौ.नानींनी अत्यंत मनोभावे सद्गुरुंवर पूर्ण श्रध्दा ठेवून पारायणे केली. प.पू.मोरेदादांची कृपा आणि सौ.नानींची सेवा फळाला आली आणि अखेर अनेक वर्षाच्या त्रासानंतर, सत्वपरिक्षेनंतर अक्कलकोट स्वामी प्रकट झाले!

१९८२ सालापर्यंत हा त्रास सुरू होता. नानांची प्रकृती क्षीण होत चालली होती. एखादी संमंध बाधा असावी अशा प्रकारचा त्यांना त्रास व्हायचा. जिथे बसतील त्या जागी चिकटून रहायचे. काही वेळा आठ-आठ माणसांनाही ते आवरत नसत. कोपरगाव ते स्टेशन एवढे अंतर चालतानाही चार वेळा बसावे लागे. परंतु एक गोष्ट खरी की नानांनी कामावर कधी दांडी मारली नाही. कर्माला कधी चुकले नाहीत. रात्रपाळी-दिवसपाळी नोकरी इमानेइतबारे केली. त्यांना संसारही चालवायचा होता. परंतु स्वामींचा त्यांच्या अंगात संचार व्हायचा. त्यावेळी ते स्वत:ला हरवून जात. त्यांचे स्वामींशी तासन तास बोलणे चालायचे. स्वामींशी संवाद झाल्यानंतर बराच वेळ डोळे उघडत नसत.

मोरे दादांनी सौ.नानींची समजूत घातली : “एक अंध सेवेकरी आपली अतृप्त राहिलेली सेवा त्यांच्यामार्फत पूर्ण करून घेत आहेत. यातून मुक्त होण्यासाठी ३ गुरुचरित्राची पारायणे कर. त्यांच्याशी महाराजच बोलतात. त्यांच्याशी सर्व नाथ बोलत असल्याकारणाने तो कोणाचे ऐकणार? आपल्याला फक्त स्वामींशी मतलब आहे. फक्त स्वामीच बोलावेत.” स्वामी प्रकट व्हावेत म्हणून सर्व कुटुंबियांनी दिवसाला १ अशी १०८ दिवसात १०८ पारायणे त्रिकाल वाचन करून स्वामी चरित्र सारामृत वाचण्यास सांगितले. स्वामींच्या मूर्तीवर श्रीसुक्त व पुरुषसुक्ताचा प्रत्येक १६/१६ वेळा अभिषेक करण्यास सांगितले. ‘पूर्व दिव्य ज्यांचे रम्य त्यांना भावी काळ’ या न्यायाने सर्व कुटुंबांची आणि नानांची कठोर परिक्षा घेऊन अखेर स्वामी प्रकट झाले आणि त्यानंतर स्वामींच्या कृपेचा वर्षाव वालावलकर कुटुंबियांवर आजपर्यंत होत आहे. हा प.पू.मोरेदादांनी दिलेला कार्यक्रम सुरु असतानाच एक दिवस देव्हा-यात २१ नाणी स्वामींनी आणून ठेवली आणि लक्ष्मी म्हणून त्याची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर एका दो-यात गुंफलेले पाच रुद्राक्ष देव्हा-यात आले. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला असता खाली ताटात वाढलेली पुरणपोळी वर देव्हा-यात स्वामी्ंच्या मूर्तीपाशी आली असे अनेक दैवी चमत्कार घडू लागले. लोकांची गर्दी होऊ लागली. आजुबाजूची तरुण मुले नाना-नानींच्या जवळ घोटाळू लागली. त्यांना दिव्य अनुभूती येऊ लागली आणि ती मुले आज नानांची परम भक्त झाली आहेत.

प.पू.मोरेदादांच्यावर नाना-नानींची अपार निष्ठा होती. आजही नाना हे माझे प्रथम गुरु म्हणून आदराने प.पू.मोरेदादांच्या फोटोकडे बोट दाखवतात. प.पू.मोरेदादांनी सांगितलेले वार्षिक उत्त्सव श्रावणात शंकराची सेवा, होमहवन, पूजापाठ, आजही सुरु आहेत. अनेक थोर-मोठया सत्पुरुषांचे, अधिकारी व्यक्तींचे पाय नानांच्या घराला लागले असून सखाराम कॉम्प्लेक्समधील श्री स्वामी समर्थ इमारतीतील पहिल्या मजल्यावरील नानांचे घर ही भक्तांसाठी आनंदाची पर्वणी ठरली. पोकळ प्रतिष्ठा बडेजाव, थोथांड, यांना इथे जागा नसे. अपपरभाव नाही. हसतमुखाने सा-यांचे स्वागत व्हायचे. नानांना भेटण्याची ठराविक वेळ नव्हती. कुणालाही मुक्त प्रवेश, स्वामींचे सदैव वास्तव्य असलेली ही नानांची कुटी म्हणजे मुक्तीचे माहेरच! श्री. नाना प्रापंचिक असूनही श्री स्वामी समर्थ कृपेने एका विरक्त योग्यासारखे मुक्त जीवन जगले. स्वामींच्या आज्ञेशिवाय नाना काही करत नसत. प्रत्यक्ष स्वामी समर्थ नानांना भेटण्यासाठी येत. प्रत्येक वेळी ते वेळ सांगून विविध वेशात विविध रुपात येत. ‘मी अमूक ठिकाणी आहे, तू तेथे ये मी तिथे तुझी वाट पहातो’ अशी स्वामींची अमृतवाणी नानांच्या कानी पडे आणि नाना त्यांना तिथे जाऊन भेटत. स्वामीबरोबर हिंडत, फिरत, नानांचे व स्वामींचे संभाषण ब-याच वेळा भक्तगणांनी, त्यांच्या घरच्या मंडळींनी रेकॉर्डही केले आहे. असे सद्गुरु आपणास लाभल्याची शिष्यांची धन्यता वाढते. स्वामींचे दिव्यदर्शन आम्हांसही घडवा, असे नानांचे शिष्य नानांना सांगत. त्यानुसार अनेक वेळा शिष्यांचा हा हट्ट नानांनी पुरविला आहे.

एकदा असाच स्वामींचा भेटीचा संदेश येताच, मी, स्वामींना घेऊन येतो, असे म्हणून नाना त्वरित घराबाहेर पडले. ‘डोंबिवली स्टेशनवर तीन नंबर प्लॅटफॉर्मवर मी तुझी वाट पहातोय’. असा संदेश होता. नानांना विडी प्यायची सवय आहे. नाना विडी ओढतओढत प्लॅटफॉर्मवर पोहोचले. प्लॅटफॉर्म तुडुंब भरला होता. एवढया गर्दीत स्वामींना कसे शोधायचे असा विचार करीत असतानाच अचानक विचार करीत असतानाच अचानक नानांच्या पाठीवर थाप पडली. नाना दचकले. विडी पटकन टाकून दिली. स्वामी म्हणाले, ‘कशाला टाकलीस विडी?’ माझ्यापासून काय लपवतोस ? ‘मला सुध्दा दे’ त्याबरोबर नानांनी स्टॉलवरून सिगरेट खरेदी केली आणि स्वामींना दिली. त्यावेळी स्वामी संन्याशाप्रमाणेच भगव्या वस्त्रात आले होते. ‘चल आपल्याला श्री गणेश मंदिरात जायचेय.’ नानांना बाहेर थांबवून स्वामी मंदिरात गेले. थोड्या वेळाने ‘चल निघू या’ असे म्हणत बाहेर आले. स्वामींचे रुप आणि वेष सर्व काही बदलले होते. भिकारी भणंग माणसाच्या रुपात, विद्रुप रुपात ते पुढे आले. नानांनी त्याबद्दल विचारताच, ‘जास्त चौकशी नको’ अशा अर्थाने ओठावर तर्जनी ठेवून त्यांना गप्प केले. स्वामींना घेऊन नाना घरी आले. ‘श्री स्वामी समर्थ’ आपल्या घरी येणार या आनंदात शिष्यमंडळाने जय्यत तयारी केली होती. सर्व जण आतुरतेने त्यांची वाट पहात होते. त्या अद्भुत रुपात स्वामी घरी आले. ज्यांना त्यांचे दर्शन मिळाले ते धन्य होत. स्वामींनी सर्वांवर प्रेममय दृष्टी फिरवली. फराळाच्या ताटांना, फळांना सर्वांना नुसता स्पर्श केला. दुधाच्या पेल्यातील चार थेंब दूध प्राशन केले आणि आले तसेच घाईघाईने निघाले. नाना त्यांना सोडण्यासाठी खाली उतरले. त्यांनी रिक्षेने जावे असा नानांनी आग्रह धरला. एका ओळखी रिक्षावाल्याने नाना दिसताच रिक्षा थांबवली. स्वामी त्या रिक्षेत बसले आणि निघून गेले. त्या रिक्षावाल्याने त्याच्या दुर्दैवामुळे रिक्षा विकायला काढली होती. अठरा हजाराला सौदाही ठरला होता. परंतु स्वामी समर्थांचे पाय रिक्षेला लागले आणि त्याचे भाग्य उदयास आले. त्याने ती रिक्षा विकली नाही. उत्तरोत्तर त्याची प्रगती झाली.

श्री नानांना घेऊन श्री स्वामी समर्थ एकदा तिन्ही लोकात भ्रमंती करून आले. नरकाग्नीत पोळणारे स्वामीकडे क्षमा याचना करीत असताना, ‘जसे कर्म केले, तसे त्यांचे फळही भोग’ असे स्वामी म्हणत होते. आपल्या शिष्यांनी, भक्तांनी नरकाग्नीतून होरपळून निघू नये म्हणून नाना सर्वांना, सत्याचा, स्वधर्माचा मार्ग धरण्याचा आग्रह करतात. सत्कर्म करा, धर्मानुसार कर्म करा आणि सुखी व्हा. ह्या नरदेहातील परमात्म्याची ओळख करून घ्या. नानांच्या सहवासात राहून अनेक शिष्य तयार झाले असून त्यांच्यात अंतर्बाह्य आमूलाग्र बदल झाला आहे. श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेप्रमाणे, सखाराम कॉम्प्लेक्स येथे श्री स्वामी समर्थांचा मठ बांधण्यात आला. उत्तरार्धात नानांचे वास्तव्य त्यांच्या गावी कोकणात मोरगाव येथे असते. अनेक वेळा नाना भक्तमंडळींसमवेत तीर्थयात्रा करीत. भक्तांच्या दृष्टीने ती एक पर्वणीच!

नाना मुंबईत आले. ते नशीब अजमावण्यासाठी. फूटपाथवर झोपून, बेवारशासारखे अनेक दिवस त्यानी काढले, खाजगी प्रेस, गव्हर्नमेंट प्रेस, गोदीत, लल्लुभाई कंपनीत अशा छोट्यामोठया नोक-या केल्या. तुटपुंज्या पगारावर दोन महिने काम केले. तर एक महिना बेकारी, पंधरा दिवसांचा पगार मिळायचा. तेरा रुपये. त्यात जेमतेम एकवेळची खानावळ भागायची. एकदा रात्री असेच फुटपाथवर झोपले असता एका पोलिसाने हटकले व चौकीवर नेले. तो पोलीसही सावंतवाडीचा होता. त्यांना नानांची पोलीस चौकीत झोपण्याची व सकाळच्या नाश्त्याची सोय केली. अजूनही नानांनी त्यांची ओळख ठेवली आहे. नानांची आई त्यांना गावी येण्याचा आग्रह करत होती. दोन तीन वेळा त्यांना न्यायलाही आली. परंतु नाना परिस्थितीला डगमगले नाहीत. प्रामाणिकपणे, शांतपणे त्यानी सर्व दिवस काढले.

नानांचा स्वभाव परोपकारी. दुसNयांना मदत करण्यात त्यांना नेहमी आनंद वाटे. कामावर टेंपररी असलेल्या लोकांना नानांचा खूप आधार वाटे. कामावरून कमी केलेल्या लोकांना नाना वॅâन्टीनमध्ये नेऊन जेवू घालत. त्यांच्यासाठी साहेबांशी भांडत. बरीच वर्ष टेंपररी काम केलेल्या काही लोकांना नोकरीवरून कमी केलं. तेव्हा जोपर्यंत त्यांना कामावर घेतले जात नाही तोपर्यंत काम बंद असा पवित्रा नानांनी घेतला आणि जे. के. फाईल्स कंपनीतील काही लोकांना पुढे कामावर घेतले गेले आणि कायम केले. नाना तुमच्यामुळे आम्ही तरलो असे ते आजही म्हणतात, आणि नाना याचे सारे श्रेय सद्गुरुंना देतात.

एकदा सेकंड शिफ्टसाठी नाना डोंबिवलीहून ठाण्याला निघाले होते. दिवा स्टेशनला एक गृहस्थ गाडीत चढले. ते नानांच्या समोर बसले. त्यांचे लक्ष नानांच्या गळ्यातील माळांकडे होते. त्या माळा सुटल्या होत्या. पुन्हा गुंपूâन घ्यायच्या होत्या. नानांनी आपल्याला काही हवे आहे का? असे विचारताच, ‘मला तुझे घड्याळ व गळ्यातील माळा हव्या आहेत’ असे सांगितले. नानांनी ही आपली सत्वपरीक्षा आहे हे समजून चटकन सर्व काढून दिले. म्हातारे बाबा मुंब्रा स्टेशनवर उतरून गेले. नाना रात्री कामावरून घरी आले. नानींनी गळ्यातील माळांविषयी विचारले तेव्हा नानांनी सर्व सांगून टाकले. सकाळी झोपून उठतात तर नानांच्या गळ्यात सर्व माळा होत्या व त्या सर्व नवीन तारांमध्ये गुंफलेल्या होत्या. घड्याळही नाना रात्री झोपताना काढून ठेवतात. तिथेच ठेवलेले होते. साक्षात स्वामींनी ही भक्ताची घेतलेली काळजी पाहिल्यावर परमेश्वराच्या अस्तित्वाची खात्री पटते. ‘सद्गुरूवाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी त्याचे,’ असेच शब्द ओठी येतात.

२ डिसेंबर, १९९४ रोजी नाना सकाळी कामावरून आले. सकाळी ११ वाजेपर्यंत विश्रांती घेऊन आपली पिशवी भरून ‘मी स्वामींबरोबर बाहेर जातो आहे,’ असे सांगून बाहेर पडले. नाना डोंबिवली स्टेशनवर आले. थोड्या वेळाने स्वामी आले. आपल्या हातातील पिशव्या नानाजवळ देऊन ‘माझ्या पाठोपाठ ये’, असे सांगून ब्रिजवरून उतरून रामनगरमध्ये चालू लागले. असे चालत-चालत शिळफाट्यापर्यंत आले. नानांचे पाय दुखायला लागले, त्यांनी आपण रिक्षा करू या का? असे विचारताच ‘थांब जरा’ असे म्हणून स्वामी एका झाडाजवळ गेले आणि दोन काठया नानांजवळ देऊन ‘यावर उभे रहा’ असे सांगितले. काठयांवर उभे राहताच नाना व स्वामी दोघेजण विमानासारखे हवेतून तरंगत जाऊ लागले आणि पेणच्या आसपास असलेल्या एका डोंगरावर उतरले. काठया नाहीशा झाल्या. स्वामींनी हातातील कमंडलूतील पाणी त्या पर्वतावर टाकले आणि एखाद्या भुयाराचे दार उघडावे तसे तेथील जमीन बाजूला होऊन आत उतरण्याचा मार्ग दिसला. स्वामी व नाना आत उतरू लागले. पृथ्वीच्या गर्भात बरेच खोलवर ते जाऊन पोहोचले होते. मोठमोठे केस असलेले सापासारखे परंतु माणसासारखे डोके असलेले प्राणी तेथे दिसत होते. स्वामींनी त्यांना ‘माझ्याबरोबर कोण आले आहे?’ असे विचारताच स्वामी तुमच्याबरोबर तुमचा वेडा आला आहे’ असे म्हणाले. (स्वामी नानांना ‘वेडा’ म्हणतात. नानांच्या मोठया मुलाला मूर्ख म्हणतात, घरातल्या अन्य मंडळींना स्वामींनी अशीच गोडनामे दिली आहेत) नाना थांबले. तिथे अनेक लाकडी खांब असावे, अशा वस्तू उभ्या होत्या. जवळच एक गाय होती, ‘तुझ्याजवळ असलेल्या पैशांचा चारा विकत घेऊन या गाईला घाल’ स्वामी म्हणाले. त्यावर ‘मला इथे चारा कोण देणार?’ असे नानांनी बोट दाखवले. ‘तो समोर उभा आहे, (खांब) त्याला सांग’ नानांनी त्या खांबाजवळ पैसे पुढे करून गोमातेसाठी चारा मागितला. त्यांबरोबर त्या खांबाजवळ एक माणूस हजर झाला. त्याने एक मोळी नानांसमोर ठेवली. नानांना काही ती उचलता येईना. शेवटी स्वामी म्हणाले, ‘तू ये, तो घेऊन येईल.’ त्या माणसाने ती मोळी नानांना गाईजवळ आणून दिली.

नानांनी तो चारा गाईच्या मुखाजवळ नेला, तेव्हा त्या ठिकाणी आदीमाया प्रकट झाली. नानांनी नमस्कार करताच त्या मोळीचे धान्यात रुपांतर झाले. माता म्हणाली, ‘मी अन्नपूर्णा आहे, तुम्ही काय जेवणार?’ नाना म्हणाले, ‘मला काही नको’ स्वामी म्हणाले, मला चहा पाहिजे. तेव्हा मातेने स्वामींना व नानांना चहा दिला. ते धान्य प्रसाद म्हणून नानांच्या झोळीत टाकले व घरी नेण्यास सांगितले व घरी गेल्यावरच उघडण्यास सांगितले. मातेने नानांना सांगितले की, ‘मी तुझ्या मुलीच्या लग्नाला हजर असेन’ काळजी करू नकोस. नंतर स्वामींनी नानांना खिडकाळीच्या शिवमंदिराजवळ आणून सोडले. तेथून नाना घरी आले. तेव्हा सायंकाळ झाली होती. नानांच्या झोळीतील धान्याचे फरसाण, मोतीचूर लाडू, मनुका अशा प्रसादात रुपांतर झाले होते. नानांची स्वामींबरोबर बाहेर जाण्याची ही तिसरी वेळ होती. अशा या विभुतीच्या मठात येऊन आपणही आपल्या जीवनाचे सोने करा!