(चाल – पृथ्वी वृत्त)

महिम्न शिव शंकरा । तव अगाध बा थोरवी । अपार महती अशी । नच पुरेल ब्रह्मा कवी।
यथा मति किती स्मरू । तव गुणास ना बा मिती । अजाण ‘अविनाश’ हा । तुज समर्पीतो ही कृती ।।१।।

अगाध महती तुझी श्रुती न जी पुरे जाणते । मनास न कळे तसे । चकित होत बा वेद ते ।
न व्यक्त जगती तुझे। सत्‌ – स्वरूप साकारतो । कवित्व बघ तोकडे। तव गुणास ना पार तो ।।२।।

महिम्न नच ही सुधा । मधुर जी शिवा आवडे । जरी पुढती ब्रह्म तो । नवल ना तया भासते ।
पतीत मज पावण्या । मन रमो तुझे गायनी । कृतार्थ कर शंकरा । त्रिपुर दाहका जीवनी ।।३।।

जगी जनक ब्रह्म तो । जगत्‌ जीवनी श्रीहरी ।। शिवा विलय साजसे । कथित वेद हे तीनही ।
त्रिकाल तव रूप बा । बुध जनास संमोहना । अजाण तुजला कसे । सकल जाणती सांग ना ।।४।।

कशास जग निर्मिले । नच कुणासही आकळे । भ्रमात पडता जग । शिव कधी कुणा ना मिळे ।
कुतर्क बघ संभ्रवी । विचल भाविकांना करे । जगात मूळ कां कुणा । गवसले नदीचे बरे? ।।५।।

जगात ऋतुचक्र नि । विविध रंग सृष्टीतले । चराचर ही निर्मिशी । अतिसुरेख वेलीफुले ।
महेश बहूरूपता । प्रणत रम्य ही भोंवती । जरी कळत नास्तिका । पढतमूर्ख ते भांडती ।।६।।

त्रिवेद शिवपंथ तो । कपिल सांख्य ना योग बा । रूचे पशुपतिस जो । विविध तो गमे वैष्णवा ।
अखरे शिवसागरी । सकल पंथ सामावती । जशा सकल त्या नद्या धवल सिंधुला भेटती ।।७।।

जयास खटवाङ्‌ही । परशु भस्म नंदी प्रिया । करात कवटी धरी । अजिन सर्प शोभेजया।
शिवा वरद आत्मजा । उघडि नेत्र आता तरी । कृपाळू शिव तोषता । सकल सिद्धि लाभे खरी ।।८।।

अशाश्वत जगास या । परमतत्त्व मानी कुणी । कुणास सत् भासते । असत्‌ सांगती ते कुणी ।
अता त्रिपुरनाशका । शरण येत चक्रावुनी । शिवा शरण येत जो । सकल पावतो जीवनी ।।९।।

वितर्क घडता हरी । जनक अग्नीला मापिती । महिम्न कळता तुझे । षड्‌रिपू झणी त्यागती ।
बघा षड्‌रिपू कसे । कारित मानवाची स्थिती । शिडाविणची तारू ते । की भवसागरी धावती ।।१०।।

शिवास शिर पंकजा । विमल आपुले वाहता । म्हणोन शिव देतसे । अभय रावणा तोषता ।
त्रिलोक जग जिंकता । जणु अजेय लंकापती । विनम्र शरणागता । सकल आर्पितो श्रीपती ।।११।।

त्रिलोक जय लाभता । बहु वसे अहंता मना । म्हणे कठीण जिंकणे । मजसी आज कैलास ना ।
क्षणात बघ लोपले । अखिल राज्य लंकापती । करी जवळ ना कधी । विबुध ते अहंतेप्रती ।।१२।।

त्रिलोक अन्‌ जिंकला । सबल इंद्र बाणासूरे । अजय बघ बाणतो । नवल ना परी हे खरे ।
जया वरद श्रीपती । नच उणे तया जीवनी । शिवा शरण येत जो । सकल लाभते ते मनी ।।१३।।

सुरास भय जाहले । त्रिनयना विषा पाहता । जगा अभय अर्पिले । सकल ते स्वये प्राशता ।
विनाश टळला परी । विष प्रभाव तो आगळा । शिवास बहु शोभतो । विमल कंठ तो बा निळा ।।१४।।

समाधि तुज लागता । मदन जाळ टाकी जरी । हळूच तिसऱ्या शिवा । उघडी लोचना सत्वरी ।
क्षणी मदन भस्म तो । तुजसी स्वस्थता लाभते । जगी विचल राहतो । मदन बाण ज्याला रूते ।।१५।।

करीत शिव तांडवा । प्रलय नर्तनी भास कां । फिरे भुज तुझे असे । विखरती नभी तारका ।
जटा झटकता भये । पळति स्वर्गिच्या देवता । शिवास लय सृष्टिचा । नच गमे खरा रक्षिता ।।१६।।

जटेत बघ शोभते । धवल शुभ्र ती गोमती । जरी गगन दिव्य ती । तव शिरात बिंदुप्रति ।
शिवे भगीरथाप्रती । धरतिसी तिला आणले । जगात द्विप सात ते । बहूत साजरे शोभले ।।१७।।

सदाशिव करे गमे । बहु धनुष्य मेरू महा । तुझ्या धरतीच्या रथा । रवि व चंद्र चक्रे पहा ।
उपेन्द्र बघ बाण ज्या । जगत बह्म तो सारथी । असा शिव समर्थ त्या । त्रिपूर दाह लीलेप्रती ।।१८।।

शिवा नित सहस्त्र ते । कमलपुष्प वाहे हरी । क्षणी नयन अर्पिले । कमल एक होता कमी ।
हरीस शिव तोषता । नित सुदर्शना अर्पिले । करात बघ विष्णूला । जगत रक्षण्या शोभले ।।१९।।

सदाशिव समर्थ तो । सकल जाणतो भावना। मनात जरि वासना । नच फळेल आराधना ।
विषाद जगती वृथा । अढळ ठेव श्रद्धा मनी । मना फळसि यज्ञ ते । श्रृतिस जाणता जीवनी ।।२०।।

शिवा सकल अर्पितो । प्रमुख यज्ञश्री दक्ष तो । परी तव कृपा नसे । तर कसा फळे यज्ञ तो ।
शिवास अपमान तो । सकल नाश होतो तिथे । तिथेच शिव नांदतो । विमल भाव भक्ती जिथे ।।२१।।

पिताच बघ भाळतो । विमल शारदेच्या वरी । बनोनी मृग बह्म् तो । विचल धावतो सत्वरी ।
शिवास नच हे रूचे । शिव बने क्षणी व्याध तो । नभात शिव बाण तो । नित मृगाकडे धावतो ।।२२।।

क्षणी मदन जाळिला । नित धनुष्य ज्याचे करी । असा मदन भस्म तो । तृण जळे जसे सत्वरी ।
तपास शिव पावता । प्रिय तुला सदा पार्वती । शिवास वश मानिते । नच अजाण स्त्री मुग्ध ती ।।२३।।

शिवा सतत सोबती । विहरता स्मशानी भुते । गळ्यात नरमुंडकी । तनुस भस्म ते शोभते ।
भयावह स्वरूप हें । वरदची गमे सेवका । अमंगल दिसे परी । परममंगला भाविका ।।२४।।

समाधि जप साधना । करित नित्य योगी झटे । फुले सुखद भावना । तनुस रम्य काटा फुटे ।
झरा नयनि पाझरे । शिव सरोवरी डुंबती । शिवासम नसे जगी । परमतत्व बा सांप्रती ।।२५।।

महेश रवि चंद्रमा। जल समीर ना आप तू । तुझी धरती आत्मजा गगन तेज नी अग्नि तू ।
असाच शिव ज्ञात जो । सिमीत ते बुधा भासते । शिववीण नसे जगी । अमर तत्त्व विश्वात ते ।।२६।।

महिम्न नच वर्णवे । म्हणति वेद ते तीनही । तसेच नच तीन त्या । बघ कळे अवस्थेसही ।
परि शिव त्रिवेदनी । त्रिभुवनात साकारतो। ध्वनी प्रणत ब्रह्म तो । शिवस्वरूप ओंकार तो ।।२७।।

महेश भवरूद्र तो । पशुपती शवं उग्र तो । शिवाष्टकचि भीम तो । अन्‌ तयात ईशान तो ।
जगी सकल देवता । श्रुति तुला नमिते खरे । सतेज शिवरूप ते । प्रिय तया नमू आदरे ।।२८।।

स्वरूप अणुचे परी । नभ शिवा पडे ठेंगणे । सदा वसंत अंतरी । प्रीय तुला अनंता वने ।
लहान अन्‌ थोर तू । त्रिनयना सखा भाविका । वसे जवळ दूर तू । नमन घेई सर्वात्मका ।।२९।।

रजोगुण वसे बहु । जनक त्या भवा वंदितो । तमोगुण वसे बहु । हर अशा शिवा वंदितो ।
जगी सुखद तत्व तू । बहुगुणी मृडा वंदितो । शिवा सकल यज्ञ तू । परम निर्गुणा वंदितो ।।३०।।

जरी विचल या मना । चरण हे तुझे लाभले । तयास खुळ का शिवे । रजत कांचनाचे भले ।
असा चकीत होतसे । सबळ प्रेरणा जाहली । कवित्व सुमने तुला । वरद शंकरा वाहिली ।।३१।।

विशाल गिरी काजळा । सकल ओतले सागरी । करी सुरतरू बघा । सरळ लेखणी साजरी ।
जरी विमल शारदा । धरतिपत्र घे लेखना । अहर्निश लिही तरी । शिवगुणास तो पार ना ।।३२।।

शिवास भजती पहा । ऋषि प्रभू तसे दैत्य ते । शिरी सगुण निर्गुणा । धवल चंद्रिका शोभते ।
शिव स्तवन अर्पिता । मधुर अमृताचे परी । महिम्न रचना जगी । अमर पुष्पादंता करी ।।३३।।

कि निर्मल महिम्न हे । पठण जो करी आदरे । विशुद्ध मन ठेवता । नित शिवास जो का स्मरे ।
बनेल शिवरूद्र तो । शिव जगी तया स्थान ते । जगात धन कीर्ती नी । विमल संतती लाभते ।।३४।।

महेश तुझिया परी । नच बरी दुजी देवता । गिरीश महिमा परी । नच बरा दुजा तारता ।
सदाशिव गुरुपरी । अमर तत्व ना जीवनी । खरा शिवचि मंत्र तो । त्रिभुवनात संजीवनी ।।३५।।

मिळेल बहु पुण्य बा । पठतं या महिम्नास जे । करीत सगळ्या क्रिया । मिळत एक सोळांश ते ।
तपास बसला दिले । बहुत दान दिक्षा जरी । तथा भ्रमणभूवरी । सकल तीर्थ केले जरी ।।३६।।

मिळेल शिवभक्त कां । जगति पुष्पदंताप्रती । महान नृप शोभतो । सकल यक्ष ते मानिती ।
शिवा शरण येत तो । शिव तयावरी कोपता । महिम्न तव दिव्य हे । रचित लोपते भ्रष्टता ।।३७।।

माहिम्न विनये खरे । पठण रोज केली कृती । शिवा सामीप पोचवी । घडवि स्वर्ग मोक्षाप्रती ।
महिम्न वरदान हे । ऋषी मुनी तया पूज्य ते । असे सुफल स्तोत्र हे । नच ठरे कधी व्यर्थ ते ।।३८।।

सुशब्द सुमने पूजा । शिवपदावरी वाहता । सदाशिवचि पावतो । शिव महेश माझा पिता ।।३९।।

न तत्त्व तव जाणतो । शिव कसा मला ना कळे । परि नमन त्या शिवा । मज स्वरूप जे का कळे ।।४०।।

जरी पठण अेकदा । द्वय कि तीनदा जो करे । हरी सकल पाप तो । शिव जगात जातो खरे ।।४१।।

शिवस्तवन ही सुधा । अमर पुष्पदंताकृती । हरी सकल पाप जी । प्रिय शिवा असे फार ती ।
करीत नीत पाठ जो । घडत चित्त एकाग्रता । तयास शिव पावतो । सकल सृष्टीची देवता ।।४२।।

शिवस्तवन पूर्ण बा । जनक श्रेष्ट गंधर्वची । मनोहरचि पुण्यदा । अनुपमेय हे सत्यची ।
‘सदाशिवसुता’ गमे । अमर दिव्य वाणीखरी । शिवार्पण असो सदा । सकल दुख: चिंता हरी ।।४३।।

इति श्री पुष्पदंत विरचितं शिवमाहिम्न स्तोत्र संपूर्णम्‌ ।।

Leave a Reply