इयत्ता सातवी पर्यंतचे, शिक्षण घेतल्यावर नशीब अजमावण्यासाठी नानांनी मुंबईची वाट धरली. त्यावेळची मुंबई ही वेगळीच होती. तिच्याबद्दल खेडेगावच्या लोकांना कमालीचे आकर्षण होते. वयाच्या तेराव्या वर्षी नाना आपल्या बंधुंकडे ठाण्याला आले. दीड रुपया रोजावर नोकरीस प्रारंभ केला. त्यानंतर नोकरीसाठी पाच वर्षे संपूर्ण मुंबई पालथी घातली. नातेवाईकांना त्रास नको म्हणून ते बाहेर रहात. तुटपुंजे शिक्षण, खेडेगावाकडून आल्यामुळे भोळसटपणा अंगी असलेल्या नानांना मुंबईत खूप टक्के टोणपे खावे लागले. कधी अन्न मिळाले तर मिळाले, नाही तर कधी उपाशीपोटी दिवस काढावे लागले. फुटपाथवर पथारी पसरायची आणि दिवसभर नोकरीसाठी वणवण करायची! एकदा असेच फिरत असताना एका व्यक्तीशी नानांचे भांडण झाले. त्यांना पोलीस कस्टडीत ठेवले गेले. दंड भरायला पंधरा रुपये जवळ नव्हते त्यामुळे रात्रभर जेलमध्ये राहून सकाळी नानांची तिथून सुटका झाली. तेथे असलेल्या इन्स्पेक्टरनी नानांना थोडे दिवस आश्रय दिला… तीन महिने, सहा महिने अशा दोन-चार नोक-या झाल्या. गिरगावात झावबाच्यावाडीत नानांनी नऊ महिने चहा-भजी खाऊन बेकारीत दिवस काढले.

Leave a Reply